अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताबद्दल विशेष प्रेम असल्याचं अनेक वेळा बोलून दाखवलं आहे. आता बराक ओबामा यांनी लहानपणी आपण इंडोनेशियात असताना रामायण-महाभारताचे किस्से ऐकल्याचा दावा आपल्या पुस्तकात केला आहे. ओबामा यांनी लिहिलेल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाचा पहिला भाग आज प्रसिद्ध होणार आहे.
ओबामा आपल्या पुस्तकात म्हणतात, “2008 च्या अगोदर मी भारतात गेलो नव्हतो. पण माझ्या कल्पनेत भारताविषयी विशेष स्थान होतं. या अवाढव्य देशात 2700 वेगवेगळ्या जाती समाजाचे लोक राहतात. तसेच 700 पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. मी जेव्हा इंडोनेशियात राहत होतो तेव्हा रामायण-महाभारताचे किस्से ऐकायचो.”
बराक ओबामा यांनी आपल्याला बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील आवडत असल्याचं पुस्तकात नमूद केलं आहे. पाकिस्तान आणि भारतातील मित्रांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये आवड निर्माण करण्यास मदत केली असं देखील ते सांगतात.
ओबामांनी लिहिलेल्या या पुस्तकात ओसामा बिन लादेन याचा देखील उल्लेख आहे. हे पुस्तक दोन भाग प्रसिद्ध होणार असून पहिला भाग 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.