बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. या सरकारमध्ये भरती घोटाळ्याचे आरोप असलेले मेवालाल चौधरी यांना शिक्षण मंत्री बनवण्यात आलं आहे. अनेक नेत्यांनी याला विरोध केला आहे. आता राष्ट्रीय जनता दल पक्षाने मेवालाल चौधरी याचा एक व्हिडिओ शेअर केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.
राजद पक्षानं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मेवालाल चौधरी यांचा राष्ट्रगीत म्हणत असतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये मेवालाल चौधरी चुकीच्या पद्धतीने राष्ट्रगीत म्हणत असल्याचं दिसत आहे. ‘भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या बिहारच्या शिक्षण मंत्र्यांना राष्ट्रगीत देखील म्हणता येत नाही. नितीश कुमार तुम्हाला याची लाज वाटत नाही का, असा प्रश्न राजद पक्षाने केलाय.
शेअर केलेल्या व्हिडिओच्या शेवटी वंदे मातरम तसच भारत माता की जय या घोषणा दिल्या आहेत. पण जर देशाचं राष्ट्रगीतच जर योग्य पद्धतीनं म्हणता येत नसेल तर या घोषणा देण्याला काय अर्थ आहे असा सवाल नेटकर्यांनी केला आहे.