आयपीएलच्या तेराव्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सनं दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर संघाच्या मालकीण नीता अंबानी खुश झाल्या असतील, यात नवल नाही. पण त्यांच्या नावानं सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत आहे.
आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सचा विजय झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण नीता अंबानी 99 हजार जिओच्या ग्राहकांना 499 रुपयांचा रिचार्ज मोफत देत असल्याचं मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसंच ही ऑफर फक्त 20 नोव्हेंबर पर्यंत लागू असल्याचा देखील दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
या मेसेजमध्ये एक वेबसाइटची लिंक दिली असून त्यावर क्लिक केल्यानंतरच रिचार्ज मिळू शकतो, असा दावा केला आहे.
मेसेजमध्ये दिलेल्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुकेश अंबानींचा फोटो दिसतो. या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी टाकायला सांगितला आहे. जेव्हा आम्ही जिओची अधिकृत वेबसाईट चेक केली, तेव्हा अशा प्रकारची कोणतीही योजना नसल्याचं समोर आलंय.
अशा वेबसाईटच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून पाचशे रुपये कमावण्याची योजना व्हायरल झाली होती.
भविष्यात तुम्ही दिलेल्या माहितीचा वापर करून तुमच्याच बँक अकाउंटमधून पैसे काढले जाऊ शकतात. त्यामुळे जरी तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक अशा प्रकारच्या वेबसाईटला दिला तरी कसल्याही परिस्थितीत ‘ओटीपी’ शेअर करू नका.