भारतातील पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक असून कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक चणचण भासत आहे असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं आहे. कुस्ती क्षेत्रात ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीपती खंचनाळे यांच्या उपचारासाठी कुस्तीप्रेमींनी आर्थिक मदत करावी, असं आवाहन त्यांचा मुलगा रोहित खंचनाळे यांनी केलंय.
हिंदकेसरी ही भारतातील कुस्ती क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेची सुरुवात 1958 पासून करण्यात आली. हिंदकेसरी होण्याचा मान मिळणं कुस्तीच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं.
कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवान श्रीपती खंचनाळे यांना भारतातील पहिले हिंदकेसरी होण्याचा मान मिळाला. दिल्ली येथील नेहरू स्टेडियमवर 3 मे 1959 मध्ये पैलवान श्रीपती खंचनाळे यांनी पैलवान बनता सिंग यांचा पराभव केला.
कुस्ती क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत नवीन पैलवानांची मातब्बर फळी तयार करण्याचे काम पैलवान श्रीपती खंचनाळे यांनी केलं.
श्रीपती खंचनाळे गेल्या तीन वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलं. पण त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
एखादा राजकीय व्यक्ती किंवा अभिनेता हॉस्पिटलमध्ये असतो, तेव्हा मीडिया तिथेच पडून असते. मात्र देशातील पहिल्या हिंदकेसरी पैलवानाला कोणीही भेटायला येत नसल्याची खंत श्रीपती खंचनाळे यांच्या मुलाने बोलून दाखवली. तसंच कुस्ती प्रेमींनी वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहनही केलं आहे.
कुस्ती-मल्लविद्या महासंघ या कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेनं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रीपती खंचनाळे यांच्यासाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी उभी करता येईल, यासाठी प्रयत्न चालवले आहेत.