दिवाळी नंतर कोरोनाचा प्रभाव कमी होणार असल्याचे अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवले होते. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यावर लस निर्माण करण्याचे काम चालू आहे.
कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज लसीकरण संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरवणार आहेत. याबद्दल सरकारी मंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असा प्राधान्यक्रम असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
लस उपलब्ध झाल्यानंतर पहिला डोस कोरोना संकटाचा थेट सामना करणाऱ्या एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला जाईल असे सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. लस व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटातील सूत्रांच्या माहितीनुसार या लसीकरणासाठी पहिल्या प्राधान्यक्रम गटाचे डाटाबेस तयार करण्याचे काम सुरू असून लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात येणार आहे.
लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक असणारा सर्व डाटा राज्यातील ९३ टक्के रुग्णालयांनी दिला आहे, तसेच खासगी क्षेत्रातील ही ५६ टक्के रुग्णालयांनी डाटा देऊन चांगला प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
शाळा सुरू झाल्या पण विद्यार्थ्यांची उपस्थिती अवघी पाच टक्के!
‘भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय’