भाजपाचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. अनेक भाजप नेत्यांनी गायकवाड यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर टीका केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या टीकांना उत्तर देताना भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. “महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार सुरू आहे. त्यांना सर्वसामान्यांचा ज्या पध्दतीने पाठिंबा मिळतोय, तो पाठिंबा मिळाल्यामुळे ते नैराश्य आले. त्या नैराश्यातून हे सर्व होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही, या संबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे. हा संताप या माध्यमातून व्यक्त केला जात असल्याचे शरद पवार म्हणाले.
तसेच “मंदिरं उघडण्याच्या विषयावर जे काही राजकारण केलं गेलं, त्यावर मी काही भाष्य केलं नाही. एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं, त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं. पण ठीक आहे, निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही,” अशा शब्दात पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा देखील समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकार बेईमान सरकार आहे असे म्हटले होते. त्याला प्रतिउत्तर देताना “सत्ता गेल्यानंतर त्रास होतो, मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी अशाप्रकारचे शब्द सामान्यपणे न वापरणारेही वापरायला लागतात. त्यामुळे ते गांभीर्याने घेवू नये.” असे पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.