सिडनी: आज सिडनीत भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात एकदिवसीय क्रिकेट सामना पार पडला. फेब्रुवारी महिन्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी भारत संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. हा सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेट चाहत्यांनी मैदानात हजेरी लावली होती.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सहा षटकांचा खेळ झाल्यावर अचानक दोन आंदोलक मैदानात पोस्टर घेऊन घुसले. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांच्या हातात ‘अदानींना पाच हजार कोटीचे कर्ज देऊ नका’ अशा स्वरूपाचे पोस्टर होते.
हे दोन आंदोलक पोस्टर घेऊन थेट पिचपर्यंत जाऊन पोहचले. सुरक्षारक्षकांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण अदानींना पाच हजार कोटींचे कर्ज देऊ नका अशा स्वरूपात असलेले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.
ऑस्ट्रेलियात अदानींना का विरोध होतोय?
अदानींना ऑस्ट्रेलियात कोळशाच्या खाणी सुरू करायच्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी एसबीआय बँक सरसावली आहे. एसबीआय बँक अदानींना ऑस्ट्रेलियात कोळशाच्या खाणी सुरू करण्यासाठी पाच हजार कोटींचे कर्ज देणार आहे.
ऑस्ट्रेलियात जर कोळशाच्या खाणी सुरू केल्या तर पर्यावरणाच्या प्रदूषणात अजून भर पडेल. तसंच ग्रेट बॅरियर रीफला मोठा धोका निर्माण होईल, असा दावा आंदोलकांनी केला आहे.
या विरोधात ऑस्ट्रेलियात #stopadani चळवळ सुरू झालीय. याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन थेट क्रिकेटच्या मैदानात घुसले होते.