मुंबई | सोशल मीडियाचा गैरवापर करत अनेक सेलिब्रिटींची फेक आयडी तयार करून, चाहत्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जातं आहे. अशा फेकआयडीरून चाहत्यांची फसवणूक केली जात आहे तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणीही केली जात आहे. अशा प्रकारची अनेक प्रकरणं याआधीही समोर आली आहेत.
बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे याची फेक आयडी तयार करून, महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. अश्लील मेसेजेस आणि पैशांची मागणी सोशल मिडियाच्या फेसबुक प्लॅटफॉर्मवर केली जात आहे. अशी तक्रार शिवच्या काही चाहत्यांनी त्याच्या अधिकृत सोशल मिडीया प्रोफाईलवर केली आहे.
या संदर्भात “मी तसा सोशल मीडियावर सक्रिय असतो. कामात व्यस्त असल्याने बऱ्याचदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. त्यांचे मेसेज वाचणे राहून जाते. मात्र, माझ्या नावाने असे एखादे फेक प्रोफाईल तयार केली गेली याची मला कल्पना नव्हती.”
सगळ्यांना उत्तर देण्याइतका खरंच वेळही नसतो कधी कधी. पण, या खोट्या प्रोफाईलवरून तर थेट समोर मेसेज केले जात आहे. शिवाय आपल्या आवडत्या कलाकाराकडून मेसेज आल्याने चाहतेदेखील आनंदाने त्यांना रिप्लाय देत आहेत. यानंतरही अज्ञात व्यक्ती महिला आणि मुलींना अश्लील भाषेत काही प्रश्न विचारून त्यांना त्रास देत आहे. तर अनेक जणांना खोटे मेसेज करून फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रोफाईलवर माझाच फोटो वापरण्यात आला आहे. पांढऱ्या कोटमध्ये, बुलेटवर बसलेला हा माझा फोटो एका शूटदरम्यानचा आहे. हे खोटे प्रोफाईल खरे वाटावे, म्हणून सगळे खटाटोप केले गेले आहेत. ही गोष्ट समोर येताच मलाही धक्का बसला आहे. या सगळ्यात कोणीही या खोट्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन मी माझ्या सगळ्या चाहत्यांना करतो आहे, असं शिव म्हणाला.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचेही शिव म्हणाला आहे.
नक्की वाचा – Oscar Award: जल्लीकट्टू चित्रपटाला ऑस्कर नामांकन; 27 चित्रपटांना मागे टाकून मिळवली एंट्री