साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर प्रत्यक्षपणे टिका केली. यासोबत शरद पवार तसेच इतर माजी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय, उदयनराजेंच्या या टीकेला आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले.
उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या टीकेवर शशिकांत शिंदे उत्तर देताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वच पक्षांची मागणी आहे, मात्र समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले, चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर आरोप करीत आहे, तसेच राज्य सरकारही मराठा आरक्षणाच्याच बाजूने आहे.
केंद्र सरकार जर अर्णव गोस्वामी साठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करत असेल, तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत ही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सूचना द्याव्यात यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा असेही शिंदे म्हणाले.
मागील पाच वर्ष फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता, मात्र त्या पाच वर्षांत फडणवीस सरकारला हा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री करा, मग आरक्षणाचा प्रश्न बघा कसा मिटतो, हे उदयनराजेंचे विधानही हास्यास्पद आहे असे शिंदे म्हणाले, शेवटी मराठा बांधवांनी एकजूट आणून सरकारवर दबाव आणल्याने फडणवीसांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते न्यायालयात टिकले नाही, त्यामुळे आरक्षण देताना राष्ट्रपतींची परवानगी का घेतले गेले नाही असा प्रश्नही आमदार शिंदे यांनी केला आहे.
तसेच उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याने उदयनराजेंनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे ही मागणी होणे स्वाभाविक आहे, मात्र उदयनराजे नेतृत्व का करत नाहीत हाच प्रश्न आहे असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.