‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिजा’, आणि ‘स्थलपुराण’ या सिनेमांचे दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडाचा अकॅडमी अवार्ड अशी ओळख असलेला “यंग सिनेमा अवॉर्ड” हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सिनेमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
अक्षय इंडीकर यांच्या स्थलपुराण या सिनेमासाठी विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्यांना या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं जातं आहे. ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’,’ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी मराठी युवा दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे. त्यामुळे सर्वांनाच आनंद होत आहे.
‘उदाहरणार्थ नेमाडे'(docufiction film) या वेगळ्या सिनेमापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या स्वतंत्र आणि अनोख्या शैलीमुळे त्यांचे सिनेमे जगभरातील फिल्म फेस्टीवलमध्ये चर्चेत येऊन नावाजले गेले. बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये स्थलपुराण हा सिनेमा ‘जनरेशन कॉम्पिटिशन’ या विभागात प्रदर्शित करण्यात आला होता.
असघर फरादी, मनोज बाजपेयी, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दिकी या कलाकारांना सिनेमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या अवार्ड सन्मानित केलं गेलं आहे. या पुरस्कारसोबतच आशिया-पॅसिफिक स्क्रीन अकॅडमीची सन्माननीय सदस्यत्वता दिली जाते. तसेच सिनेमा निर्मितीसाठी या अकॅडमीकडून निधीदेखील दिला जातो.
दरम्यान, संपूर्ण जगातल्या केवळ १३०० लोकांना मिळणाऱ्या या सदस्यत्वाचा मान अक्षय इंडीकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाला मिळाला आहे.