मागच्या काही दिवसांपासून शेतकरी बिलाविरोधात पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. काही दिवस शांततेत चाललेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून थंड पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचे नळकांडे फेकले गेले. या गोष्टींमुळे क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी सुद्धा आपले पुरस्कार माघारी देणार असल्याचं निर्णय जाहीर करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला आहे.
यामध्ये अनेक अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. यात अर्जुन व पद्मश्री विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार विजेते सज्जन सिंग आणि अशा अनेक खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. पंजाब आणि हरियाणामधील जवळपास १५० खेळाडू आपले पुरस्कार माघारी देतील असा अंदाज आहे.
काय म्हणणं आहे या क्रीडापटूंचं ?
आपण सर्व पुरस्कार हे ५ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ऑलिम्पिक हॉकीपटू चीमा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की, “मागचे काही दिवस शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत चालू होतं, त्यावेळी आम्हाला काही अडचण नव्हती, मात्र आता त्यांच्यावर ज्याप्रकारे दडपशाही होत आहे आणि ज्याप्रकारे आंदोलनाला हिंसक वळण लागलं ते आम्हाला मान्य नाही. जर आमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान सरकारकडून केला जात नसेल तर आम्ही या पुरस्काराचा आम्हाला काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला आणि आपण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हे पुरस्कार माघारी देत आहोत.”