सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन करत आहेत. काहीही झाले तरी मागे न हटण्याच्या जिद्दीवर ठाम राहत सलग सहाव्या दिवशीही शेतकऱ्यांनी आंदोलन कायम सुरूच ठेवले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांची शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळा समवेत बैठक सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे असे वक्तव्य केले.
हरियाणा मधील अंबाला येथील रेल्वे पुलाचे भूमिपूजन करण्यासाठी रतनलाल कटारिया आले होते. दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता. तेव्हा आंदोलनासंदर्भात बोलताना त्यांनी “शेतकऱ्यांना जर विरोधच करायचा असेल आणि काळे झेंडे दाखवायचे असतील तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
“सरकारने नवीन कृषी कायदे केले आहेत ते कायदे आधी शेतकऱ्यांनी वाचावे ते त्यांच्या फायद्यासाठीच बनवले गेले आहेत,” असेही कटारिया म्हणाले.
शेतकरी आंदोलनाच्या मागे काही परदेशातील शक्तींचा हात असल्याचे हरीयाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी सांगितले आहे. काही परदेशी शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आवडत नाही. त्यामुळेच ते शेतकऱ्यांना पुढे करुन मोदींच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याचा दावा दलाल यांनी केला आहे.
सिंघू आणि टीकरी येथील आंदोलनात विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांही सहभागी झाले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूड्रो यांच्यासह इतर नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यावर एखाद्या लोकशाही देशाच्या अंतर्गत मुद्द्यावर इतर देशांनी लक्ष न घालण्याचे संकेत देत परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडियन नेत्यांची चांगलीच कान उघडणी केली.