मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी आंदोलन करावे लागले होते. कोरोना काळात एसटी सेवा पुर्णपणे बंद असल्याने एसटीला मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इंधनासाठी देखील महामंडळाकडे पैसे नव्हते. यावेळी राज्य परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्याचं वेतन देणार असल्याचं जाहीर केले होते.
याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १ हजार कोटी मंजुर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री होते. कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर वेतनासाठी याआधी १२० कोटी इतकी रक्कम देण्यात आली होती. यातील उर्वरित ८८० कोटी हे ६ हफ्त्यात महामंडळाला देण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा हळूहळू पुर्वपदावर येत असली तरी देखील कोरोनाच्या भितीमुळे प्रवासी संख्या कमीच आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्न पुर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.