सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी गावातील प्राथमिक शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 2020 चा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टीचर प्राईस) मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. मुलींना शिक्षण प्रवाहात आणणं आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करणं या कामांसाठी रणजितसिंह डिसले यांना जागतिक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
रणजितसिंह डिसले यांना या पुरस्कारासोबत ७ कोटी ३८ लाखाची रक्कम मिळाली असून यातील ५० टक्के रक्कम दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या स्पर्धेतील पहिल्या ९ शिक्षकांना या पुरस्काराची अर्धी रक्कम वाटून देण्यात येणार आहे. त्यामुळे ९ देशातील हजारो मुलांना शिक्षण प्रवाहात येण्याची संधी मिळेल. ग्लोबल टीचर प्राईस पुरस्काराच्या सहा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्काराची रक्कम वाटून देण्याची घटना घडली.
जागतिक शिक्षक पुरस्कारासाठी १४० देशातून १२ हजार शिक्षकांचे नामांकन आले होते. त्यातून दहा शिक्षकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या दहा शिक्षकांमधून रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली.
शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं कार्य
सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक शाळेत 2009 मध्ये रणजितसिंह डिसले शिक्षक म्हणून आले. तेव्हा त्यांना आढळून आलं की शाळेच्या इमारतीचा वापर शिक्षणासाठी नव्हे तर गाईगुरांचा गोठा म्हणून होत आहे. तसेच शाळेत मुलींची उपस्थिती दोन टक्क्यांपेक्षा कमी होती. एवढेच नव्हे तर गावात बालविवाह नेहमीची गोष्ट होती. रणजितसिंह डिसले यांनी या वातावरणात बदल करण्याचा निर्णय घेतला.
परितेवाडी गावातील मुलांची मातृभाषा कन्नड आहे. त्यामुळे रणजितसिंह डिसले यांनी शालेय शिक्षणाच्या पुस्तकांचे कन्नड भाषेत भाषांतर करून पुस्तकं मुलांसाठी उपलब्ध केली. तसंच शिक्षण अधिक रंजक व्हावं म्हणून त्या पुस्तकांमध्ये क्यू आर कोड देखील छापले. हे क्यू आर कोड स्कॅन केल्यावर कविता, व्हिडिओ तसेच असायमेंट मुलांना दिसू लागल्या.
आता पारितेवाडी प्राथमिक शाळेत मुलींची उपस्थिती शंभर टक्के आहे. एका मुलीने विद्यापीठातून पदवी शिक्षण देखील पूर्ण केलं आहे.
रणजितसिंह डिसले शाळेत येण्याअगोदर मुलींनी शिक्षण घेणं हे स्वप्न होतं. मात्र आता याच गावातील मुली पदवीचे शिक्षण घेऊ लागल्या आहेत आणि हीच त्यांच्या कामाची पावती आहे.
क्यूआर कोडची संकल्पना 2017 मध्ये राज्य सरकारने राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला. नंतर 2018 मध्ये मानव संसाधन आणि विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी क्यूआर कोडची संकल्पना एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला. रणजितसिंह डिसले हे वैज्ञानिक प्रयोग दाखवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी यासाठी घरीच एक स्वतंत्र प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यांनी 43 देशातील 85 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी 2017 मधील लिहिलेल्या हिट रिफ्रेश पुस्तकात रणजितसिंह डिसले यांचा देखील उल्लेख केला आहे.
प्राथमिक शाळेचा शिक्षक जागतिक पातळीवर कशाप्रकारे बदल घडू शकतो, याचं उदाहरण रणजितसिंह डिसले यांनी जगाला दाखवून दिले.