दूषित पाणी व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणाऱ्या भारतीय -अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षांच्या संशोधक मुलीला ‘टाईम्स’चा पहिलाच ‘किड्स ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावर टाइम नियतकालिकाने म्हटले की, हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.
गीतांजली रावची निवड ही पाच हजार उमेदवारांतून झाली आहे. या निमित्ताने तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली. यावेळी ‘ सगळ्या प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा,’ असा संदेश गीतांजलीने तरुणांना दिला. तसेच “जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकाल. मी निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजली मुलाखतीत सांगत होती.
एकावेळी अनेक गोष्टींचा विचार करू नका. एकाच गोष्टीचा विचार करा, भले ती लहान का असेना. ती आपल्या आवडीची असावी. त्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मोठे काही तरी करण्याच्या दबावाला बळी पडू नका.- गीतांजली राव
कधी न पाहिलेल्या समस्या आमच्या नवीन पिढीपुढे आहेत, काही जुन्या समस्याही अजून आहेत. करोनाची साथ ही एक महत्वाची समस्या आहे. मानवी हक्कांचे विषय आहेत. काही प्रश्न आपण तयार केलेले नाहीत, पण ते सोडवावे लागतील. त्यात सायबर गुन्हेगारी, हवामान बदल यांचा समावेश आहे. हे प्रश्न तंत्रज्ञानामुळे निर्माण झाले असे देखील तिने स्पष्ट केले.
समाजात सकारात्मकता निर्माण करणे गरजेचे आहे. मी माझी स्वत:ची उपकरणे तयार करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. दुसरी- तिसरीत असताना मी विज्ञान तंत्रज्ञानाने सामाजिक बदल कसे करता येतील हा विचार सुरू केला असे तिने स्पष्ट केले. दहावीत असताना तिने आईवडिलांना कार्बन नॅनोटय़ूब संवेदक तंत्रज्ञानाबाबत संशोधन करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.