व्हाट्सअप आपल्या युजरला चांगली सेवा देण्यासाठी सातत्याने नवनवीन फिचर आणतं. पण आता हेच व्हाट्सअप युजरला दणका देण्याच्या तयारीत आहे. व्हाट्सअप लवकरच एक अपडेट आणणार असून तुम्हाला तुमचं व्हाट्सअप अकाउंट डिलीट देखील करावे लागू शकतं.
8 फेब्रुवारीला हे अपडेट येणार असून तुम्हाला व्हाट्सअपच्या प्रायव्हसी-पॉलिसी मान्य करायच्या आहेत. जर तुम्हाला या प्रायव्हसी-पॉलिसी मान्य करायच्या नसतील तर तुम्हाला तुमचं व्हाट्सअप अकाउंट डिलीट करावं लागेल.
WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी नंतर व्हाट्सअपवर तुम्हाला एक मेसेज दिसेल. त्या मेसेजमध्ये ‘आमच्या प्रायव्हसी पॉलिसी एक्सेप्ट करा’ किंवा ‘व्हाट्सअप अकाउंट डिलीट करा’ असे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला जर या प्रायव्हसी पॉलिसी एक्सेप्ट करायच्या नसतील तर व्हाट्सअप अकाउंट डिलीट करावे लागेल.
व्हाट्सअपची प्रायव्हसी पॉलिसी नेमकी काय असणार आहे?
आम्ही द भोंगावर व्हाट्सअपवर जाहिराती दिसत नाही तरी ते पैसे कसे कमवतात याविषयीचा लेख लिहिला होता. यामध्ये तुमच्या चॅटिंगच्या माध्यमातून फेसबुक कशा प्रकारे फायदा करून घेतं हे सांगितलं होतं.(फेसबुक जाहिरात करण्यासाठी स्वतःच्या मालकीचे इंस्टाग्राम, व्हाट्सअप यावर असणाऱ्या युजरच्या डेटाचा वापर करतं.)
8 फेब्रुवारी 2021 पासून व्हाट्सअप ‘आम्ही तुमची चॅटिंग व्यावसायिक कारणासाठी वापरू शकतो’, असा उल्लेख प्रायव्हसी पॉलिसीमध्ये करणार आहे. जर या प्रायव्हसी पॉलिसी तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही तुमचं व्हाट्सअप अकाउंट डिलिट करू शकता. जर तुम्ही व्हाट्सअपच्या प्रायव्हसी-पॉलिसी मान्य केल्या तर तुमच्या चॅटिंगचा वापर फेसबुककडून जाहिरातीसाठी केला जाणार आहे. तसंच तुमची चॅटींग इतर व्यावसायिकांना देण्याचा देखील अधिकार फेसबुकला मिळेल.