मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी रवि पटवर्धन यांच वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं आहे. २०२० या वर्षात अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. मराठी नाटक सिनेमांमध्ये रवी पटवर्धन यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. झी मराठी वाहिनीवरील ‘अगं बाई सासुबाई’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
१९७४ मध्ये त्यांनी रत्नाकर मतकरीसोबत ‘आरण्यक’ या नाटकात काम केलं होतं. वयाच्या ८२ वर्षीही त्यांनी ही भूमिका साकारली होती. त्यांचा मराठी सिनेसृष्टीत एक वेगळाच दबदबा होता. ‘एकच प्याला’ या अतिशय गाजलेल्या नाटकातही त्यांनी काम केलं होतं.
रवी पटवर्धन यांची खरी ओळख हा त्यांचा भारदस्त आवाज, झुपकेदार मिशा अशी होती. त्यांनी अनेक हिंदी मराठी सिनेमे केले. वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.