‘मोदी सरकार खोटारडे असून शेतकऱ्यांनी या आंदोलनाबाबत सावध रहावे, असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी शेतकऱ्यांना केलं आहे. जर हे आंदोलन मोडलं तर पुन्हा उभं राहू शकणार नाही, म्हणून शेतकऱ्यांनी सावध राहावं असं देखील अण्णा हजारे म्हणाले.
दिल्लीत कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनाला देशभरातील जनतेकडून पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांकडून उद्या (8 डिसेंबरला) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार शेतकरी आंदोलनावर अण्णा हजारे म्हणाले, ‘शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यांच्या मालाला हमी भाव देणे गरजेचं आहे. तसेच केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता दर्जा देणे देखील गरजेचं आहे. मात्र मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने आमच्या मागण्यांवर लेखी आश्वासन देऊन देखील त्याची पूर्तता केली नाही.’
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करताना अण्णा हजारे म्हणाले की सरकारचं तोंड उघडायचं असेल तर त्यांचं नाक दाबणे गरजेचे आहे. यासाठी अहिंसेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलन चालूच ठेवा. मोदी सरकारवर विश्वास ठेवू नका.
एवढेच नव्हे तर अण्णा हजारेंनी दिल्लीत चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून गरज पडली तर आयुष्यातल्या शेवटच्या आंदोलनाची देखील तयारी असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय.