जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एवरेस्टची उंची पहिल्यापेक्षा जास्त असल्याचे निरीक्षण चीन आणि नेपाळने नोंदवलं. मंगळवारी (ता. 8) दोन्ही देशांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ग्यावली आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही घोषणा केली. दरम्यान माऊंट एव्हरेस्ट पर्वत चीन आणि नेपाळमधील मैत्रीचं प्रतीक असल्याचं मत प्रदीप कुमार ग्यावली यांनी व्यक्त केलं.
हे पण वाचा: नासा ‘या’ कारणासाठी चंद्रावरची माती खरेदी करणार
माऊंट एव्हरेस्टची उंची का वाढली?
2015 ला नेपाळमध्ये 7.8 रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर अनेक गिर्यारोहकांनी माऊंट एव्हरेस्टच्या उंचीत बदल झाल्याची शंका उपस्थित केली होती. तसंच नेपाळकडे देखील माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती.
1954 मध्ये भारत सरकारने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. तेव्हा माऊंट एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर भरली होती. याच माहितीचा वापर आतापर्यंत नेपाळकडून केला जात होता. तसंच 2005 मध्ये चीनने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती, तेव्हा या पर्वताची उंची 8,844.43 मीटर इतकी भरली होती.
त्यानंतर आता नेपाळ आणि चीनने माऊंट एव्हरेस्टची स्वतंत्रपणे उंची मोजली असून या पर्वताची उंची 8848.86 मीटर इतकी भरत असल्याचं समोर आलं आहे. ही उंची भारत सरकारने 1954 मध्ये मोजलेल्या उंचीपेक्षा 0.86 मीटरने जास्त भरली आहे. या पर्वताची उंची मोजण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाईट सिस्टिमचा वापर करण्यात आला.