दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामुळे सरकार ‘शक्ती’ नावाच्या एका कठोर आणि स्त्रियांवरील अत्याचााविरोधात पाऊल उचलणाऱ्या कायद्याचा विचार करत होते. अखेर सरकारच्या या विचाराला यश आले असून काल महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर लवकरात लवकर हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. हे विधेयक महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसेच महिलांना आणि मुलींना सोशल मीडियावरुन त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी बनवण्यात येणार आहे.
तसेच या विधेयकाच्या तरतुदीनुसार बलात्कारी व्यक्तीस २१ दिवसांच्या आत फाशी देण्यात येणार आहे. यापूर्वी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत होती. आता मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान यावर “महाविकास आघाडीने केवळ बोलण्यावर भर दिला नाही तर कृतीही करून दाखविली आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचाराबाबत सरकारचे पाऊल सकारात्मक असून महिला आणि बालकांना या विधेयकाचा फायदाच होणार आहे,” असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.