जगभरात कोरोनावर लस तयार करण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे. काही कंपन्यांना यात यश देखील मिळालं असून फायजर आणि बायोएनटेक कंपनीने बनवलेली कोरोना लस आता अमेरिका आणि ब्रिटनमध्ये वापरण्यात येत आहे. त्याचबरोबर ब्राझील देशात देखील लवकरच या लशीचा वापर केला जाणार आहे.
कोरोनामुळे ब्राझील मधील परिस्थिती गंभीर झाली आहे. या देशाला कोरोनाच्या लसीची अत्यंत गरज आहे. मात्र “जर महिलांनी कोरोनाची लस घेतली तर महिलांना दाढी येऊ शकते किंवा माणसाचे रूपांतर मगरीत होऊ शकते”, अशा प्रकारचे बेताल वक्तव्य ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सेनारो यांनी केलं आहे. बुधवारी ब्राझील देशात लसीकरणाच्या मोहिमेची सुरुवात करत असताना बोलत होते.
हे पण वाचा: ‘श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही’ फडणवीसांनी साधला ठाकरेंवर निशाणा
बोल्सेनारो म्हणाले, “फायझर कंपनीने आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की या लसीचे जर दुष्परिणाम झाले त्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे एखाद्याने लस घेतली तर त्याचे रूपांतर मगरीत होऊ शकते किंवा महिलांना दाढी येऊ शकते. काहीही दुष्परिणाम झाला तरी या कंपन्या जबाबदार राहणार नाहीत.”
बोल्सेनारो यांनी लस घेणं बंधनकारक नसल्याचे देखील स्पष्ट केले. मात्र अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणावर फिरण्यावर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा: लस आली तरी मास्क वापरणं बंधनकारक असेल – उद्धव ठाकरे
विशेष म्हणजे बोल्सेनारो यांनी स्वतःला लस टोचून घ्यायला नकार दिला आहे. त्यांना जून महिन्यातच कोरोना लागण झाली होती. त्यानंतर तीन आठवड्यात त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे ते म्हणतात की माझ्या शरीरात अँटी बॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे मला कोरोनाची लस घ्यायची गरज नाही.
पण जागतिक आरोग्य संघटनेनुसार जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला असला तर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. तसंच तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज किती दिवस टिकतात, याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. त्यामुळे कोरोनाची लस प्रत्येकाने घ्यावी, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले आहे.