आजचा दिवस (21 डिसेंबर) खगोल प्रेमींसाठी पर्वणीचा ठरणार असून रात्रीच्या अवकाशात दुर्मिळ योगायोग पाहायला मिळणार आहे. आज रात्री सूर्यमालेतील आकारमानाने मोठे असलेले ग्रह, शनी आणि गुरु एकमेकांच्या जरा जास्तच जवळ आलेले दिसणार आहेत.
या अगोदर हे दोन ग्रह 1623 मध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर तब्बल 400 वर्षांनंतर हा योग आला आहे. या घटनेला शास्त्रज्ञांनी Saturn Jupiter Conjunction असं नाव दिलंय.
Conjunction म्हणजे नेमकं काय?
अवकाशात जेव्हा दोन खगोलीय वस्तू एकमेकांच्या जवळ आलेल्या दिसतात त्या घटनेला Conjunction म्हटलं जातं. आता यावेळी शनी आणि गुरु ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार असल्याने या घटनेला Saturn-Jupiter Conjunction म्हटलं आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार गुरू आणि शनी या ग्रहांमधील अंतर 73.5 कोटी किलोमीटर एवढं असणार आहे.
Saturn Jupiter Conjunction कसं पाहायचं?
ही घटना पाहण्यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता नाही. तुम्हाला उघड्या डोळ्यांनी देखील या दुर्मिळ खगोलीय घटनेचं साक्षीदार होता येईल. कारण हा योग पुन्हा येण्यासाठी 15 मार्च 2080 पर्यंतची वाट पाहावी लागेल.
आज (21 डिसेंबर) सूर्यास्त झाल्यानंतर साडेसहा ते साडेसात दरम्यान ही घटना पाहता येईल. यासाठी तुम्हाला पश्चिम-दक्षिण दिशेला पहायचं आहे. या दिशेला क्षितिजावर दोन तार्यांप्रमाणे चमकणारे ग्रह दिसतील.