मुंबई | राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, असा घणघणाती टोला संजय राऊतांनी सामनातून भाजप सरकारवर लगावला आहे. राऊतांच्या या टीकेचा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आता खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.
“तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…” अशी चपराक भातखळकर यांनी आपल्या ट्विटरवरून लावली आहे
शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतील…
त्यांना मला सांगावेसे वाटते की हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेलाय. तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 27, 2020
शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतील मात्र त्यांनी चिंता करू नये कारण राऊतांनी हिंदूत्व सोडले असले तरी देश हिंदुत्वाच्या धाग्यांनी मजबूत बांधला गेला आहे, असं विधानही त्यांनी यावेळेस केलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
मावळत्या वर्षाने महागाई, बेरोजगारी, आर्थिक डबघाई, निराशा, वैफल्याचे ओझे उगवत्या वर्षावर टाकले आहे. सरकारकडे पैसा नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहेत. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे.
बिहारात निवडणूक झाल्या. तेथे तेजस्वी यादव यांनी मोदी यांच्याशी टक्करच घेतली. बिहारचे नितीशकुमार व भाजपाची सत्ता प्रामाणिक मार्गाने आली नाही, अशी टीका राऊतांनी सामनातून केंद्र सरकारवर केली आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपाचेच नेते विजय वर्गीय यांनी केला. राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपाची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात, हा विचार मारला जात आहे, असा टोला लावायलाही संजय राऊत यावेळेस विसरले नाहीत.