कोल्हापुर | खडसे यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादी काॅग्रेंस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमावेळी पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
जयंत पाटलांनी याप्रकरणी भाजपलाही धारेवर धरलं आहे. पाटील म्हणाले की, “राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात असल्यास त्यांच्यापाठी ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे. देशहिताच्या निर्णयापेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीनं राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते.”
30 डिसेंबर रोजी एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. भोसरी भूखंड प्रकरणामुळे खडसेंना तत्कालिन भाजप सरकारमधील महसूल पदावरून पायउतार व्हावं लागलं. सदर प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील anti corruption bureau कडून चौकशी करण्यात आली होती. आयकर विभागाकडूनही खडसेंची चौकशी करण्यात आली होती.
भोसरी भूखंड प्रकरणावरून याआधी चार वेळा खडसेंची चौकशी करण्यात आली आहे. आता ईडी कडून सातव्यांदा चौकशी केली जाणार असल्याने खडसेंनी याप्रकरणी पूर्ण सहाय्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपमधील धुसफुसीला अखेरीस रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खडसेंच्या प्रवेशानंतर पहिल्यांदाच त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.