कोल्हापूर | पार्थ पवार मंगळवेढा पोटनिवडणुक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम देत पार्थ यांच्या उमेदवारीबाबत अशी कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार का? याबाबत संभ्रम कायम असताना पत्रकारांनी याबाबत जयंत पाटलांकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की, ‘मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. अशी कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही’
तसेच पार्थ पवार यांच्या उमेदवारी बाबत अमरजित पाटील यांनीच मागणी केली आहे. पण हा आमच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यांच्या मागणीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेते बसून निर्णय घेतील, असंही पाटील यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं.
माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या स्वरूपाचे पत्र लिहीले आहे. पोटनिवडणूकीची उमेदवारी पार्थ यांना देण्यात यावी, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची मागणी त्यांनी या पत्रातून व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे याठिकाणी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. या निवडणूकीत पार्थ यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.