नवी दिल्ली | पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या सहाय्याने देशातील जनतेशी संवाद साधण्यास सुरूवात केली. आज 27 डिसेंबर रोजी मोदींनी रेडीयो द्वारा चालू वर्षातील शेवटचा संवाद जनतेशी साधला. यादरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या वाढली असल्याची सकारात्मक माहिती त्यांनी दिली आहे.
जनतेशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला अभिमानास्पद वाटणार आहे. 2014-18 या कालावधीत भारतातील बिबट्यांची संख्या तब्बल 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
2014 सालच्या प्राप्त आकडेवारीनुसार देशातील बिबट्यांची संख्या 7,200 नोंदविण्यात आली होती. मात्र 2019 साली या आकड्यांत झपाट्याने वाढ झाली असून सध्या बिबट्यांचा आकडा 12,852 इतका झाला आहे.
तसेच देशातील मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली असून बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र आघाडीवर असल्याचंही मोदींनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं आहे.