नवी दिल्ली | वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असताना कोरोनावरील प्रभावी लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला एक सुखद बातमी कानावर पडणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘ऑक्सफर्ड-अस्ट्रोझेनिका’च्या लसीला मंजूरी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रिटन सरकारनं आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्ड-अस्ट्रोझेनिका या लसीला अद्याप मान्यता दिलेली नाही. यूके ड्रग रेग्युलेटरकडून ऑक्सफोर्डच्या लसीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळणार असल्याने भारतातही या लसीच्या वापराचा मार्ग सुलभ होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, जगभरातील अप्रगत आणि अतिशय उष्ण हवामान असलेल्या आफ्रिकेतील देशांसाठी ऑक्सफर्ड-अस्ट्रोझेनिका लस अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्सफर्डची लस स्वस्त असणार आहे. तसेच या लसीचे वाहतुकीकरण करणेही सुलभ आहे.
दरम्यान ऑक्सफर्डची लस सामान्य फ्रिज तापमानाला दीर्घकाळ टिकाव धरू शकणार आहे. सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची आवश्यकता असलेल्या भारतासारख्या देशासासाठी म्हणूनच ही लस महत्वपूर्ण मानली जात आहे. मात्र तूर्तास ब्रिटन सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे भारतातील लसीचे भविष्य अवलंबून असणार आहे.