पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार लवकरच निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मंंगळवेढ्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या स्वरूपाचे पत्र लिहीले आहे. पोटनिवडणूकीची उमेदवारी पार्थ यांना देण्यात यावी, अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची मागणी त्यांनी या पत्रातून व्यक्त केली असल्याची माहिती आहे.
मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे याठिकाणी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. या निवडणूकीत पार्थ यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादीचा मंगळवेढ्यातील विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांची नुकतीच पंढरपूरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे.