पुणे | अजितदादा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येणार आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं म्हणत असतात. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,असं खळबळजनक वक्तव्य आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. आठवले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली. मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा आहे. मात्र राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही, असा खेदही त्यांनी यावेळेस व्यक्त केला.
तसेच कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे यांच्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प बसल्याच सांगतानाच आठवले म्हणाले की, फडणवीसांच्या काळात पण चौकशी झाली होती. तेव्हा पोलिसांनी त्यांचा संबंध नाही असं सांगितलं होतं. पण त्यावेळी सध्या सरकार मध्ये असलेल्या नेत्यांनीच चौकशी करण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी आता महाविकासआघाडी सरकारनं कारवाई करूनच दाखवावी तसेच एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली असून ते प्रशासनानं काम आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.