मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याने महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. मात्र आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे.
संजय राऊत याप्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि सविस्तर माहिती देईन, अस मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलं आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ईडीच्या चौकशी सत्रावर टीका करताना केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. सावंत म्हणाले की, ‘भाजपचे जे अलिशान कार्यालये आहेत त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावे. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी’
मात्र भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकासआघाडी सरकारकडून राजकीय द्वेष बुद्धितून हे सर्व केलं जातंय असा जो कांगावा केला जात आहे तो फार मोठा जोक असून शिवसेनेनं नैतिकतेवर बोलू नये, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे.