संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली आहे. आज दिल्लीतील पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या देशभरात 119 जिल्ह्यांमध्ये 259 केंद्रांवर कोरोना लसीकरणाची ड्राय रन चालू आहे.
दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमध्ये ड्राय रनचा आढावा घेण्यासाठी डॉ. हर्ष वर्धन गेले होते. तेव्हा पत्रकारांसोबत बोलत असताना संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं विधान केलं आहे.
‘फक्त दिल्लीतच कोरोनाची लस मोफत मिळणार आहे का?’, असा प्रश्न पत्रकारांनी केला होता. यावर उत्तर देत फक्त दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 4000 मास्टर्स प्रशिक्षक तयार केल्याचे देखील डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. या प्रशिक्षकांच्या माध्यमातून देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रशिक्षण दिलं आहे.
सध्या सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला तात्काळ वापरासाठी मंजुरी मिळाली असून देशभरात लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.