आम्ही क्रिटीक करायला घाबरतो, अथवा तसे प्रयत्न ही करत नाही त्यामुळे वैचारिक पारदर्शकता ठेवण्याच्या बाबतीत कमी पडतो. वैचारिक घुसळण होण्यास आणि संभ्रमता वाढण्यास हेचं मुख्य कारण आहे अस म्हणायला अडचण नसते. क्रिटीक करतांना वस्तुस्थिती, तुलना, तर्क, सम्यक दृष्टी तितकीचं महत्वाची असते. आपल्या मताबाबत ठाम असण्याची गरज असते. मतांचा आदर करत विवेकाने ती खोडण्याची क्षमता असावी लागते. योग्य मतांचा स्वीकार करणे ही यात नितीला धरून असतेचं!
‘सवित्रीमाई फुलें’च्या बाबतीत विचार करीत असतांना आम्हाला भारतीय समाज रचनेतील त्यांच्या खोलवर दृष्टीचा अभ्यास असला की त्यांच्या त्यागाचं गांभिर्य समजतं. स्त्रीया -अस्पृश्यांचे शिक्षण यांचं रूप आजच्या एनजीओ’करण झालेल्या व्यावसायिक समाजसेवकांच्या आणि प्रस्थापितांच्या शिक्षणसंस्थांपेक्षा किती तरी पटीने सुव्यवस्थित होते याचं उत्तम उदाहरण ‘मुक्ता साळवे’ होते याची हलकीशी जाणीव तरी आजच्या समाज सेवकांना, शिक्षण संस्थांना होण्याची गरज आहे.
आपल्या भूमिका या वैचारिकतेसोबत सामान्यवर्ग पडताळत असतो. अनुकरण करीत असतो यासाठी परिवर्तनाचा वसा धरणाऱ्या लोकांनी आपल्या कृतीला फार सचेतपणे निभावण्याच्या गरज असते आणि आपले कार्य ‘आदर्शवादी’ ठरेल यासाठी प्रयत्नशिल ठेवण्याची गरज असते. याचं उदाहरण आपण १८६३ साली स्थापन केलेल्या ‘बालहत्या प्रतिबंधक गृहा’तुन अथवा केशवलपणाच्या विरुद्ध घडवून आणलेल्या ‘न्हाव्यांच्या संपा’तून आपण बघू शकतो.
स्त्री म्हणून सामाजिक दर्जा निम्म असतांना समाज, साहित्य, शिक्षण इ. क्षेत्रात अव्वल असणाऱ्या सावित्रीमाईंनी इतरांना आपल्या बोटाला धरत समतेचा सूर्य दाखविण्याचा अट्टहास धरला होता हे येथील प्रत्येकाने समजण्याचे, अनुकरणशिल होण्यास साधक उदाहरण आहे असं मला वाटतं.
सावित्रीमाई राष्ट्रउन्नतीच्या कार्यात असलेले आधुनिक विचार आणि स्त्रियांच्या प्रगतीसाठीचं योगदान लक्षात घेता भारतीय स्त्रीवाद्यांचं ऊर्जास्त्रोत ही सावित्रीमाई आहे अस म्हणण्यास कोणाला ही वावग वाटणार नाही. आज महामानावांच्या होणाऱ्या हायजॅक प्रक्रियेत जर सावित्रीमाईंना टिकवून अपेक्षित सामाजिक क्रांतीचं स्वप्न पाहणाऱ्यांना याचमुळे वर म्हटल्याप्रमाणे क्रिटिक करत आपल्या भूमिका सामान्यांत पोहचविण्याचं गरज आहे.
आज सवर्ण पुरुषी मानसिकतेतून स्त्री प्रश्नांना वाचा फोडली जाऊ शकत नाही हे आम्ही जसे ठाम केले आहे तसेचं आम्हाला पारंपरिक आणि परदेशी स्त्रीवादी दृष्टीकोनाची ही चिकित्सा करणे गरजेची आहे. सावित्रीमाईंच्या भूमिकांना रुजविण्याची गरज आहे, आणि त्याचं साठी टीका -आत्मटिका करत मार्गस्थ व्हावं लागणार आहे.
आज सनातनी कुप्रथा पून्हा आपला फना उघडपणे वर काढीत आहे. सामाजिक माध्यमांत हस्तक्षेप करीत चुकीच्या धोरणाचा गौरव केला जात आहे. नुकताचं चर्चेत असणाऱ्या ‘सावित्रीजोती :आभाळा एवढं माणस होती..’ या डेलीसोप’च्या बंद पडण्यामागील मिळालेली असमाधानकारक कारणे ही आम्ही जाणतो, यातून आपण सुपात धन्यता मानण्यापेक्षा जात्यात भरडलो न जाण्यासाठी प्रयत्नशील होण्याची गरज येऊन ठेपली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना जन्मदिनी कृतिशील अभिवादन !
– संविधान गांगुर्डे