गंज पेठ ते भिडेवाडा हा प्रवास फक्त त्यांच्या एकटी साठीचा नव्हता. हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत ‘पाडलेल्या’ स्त्रियांच्या मुक्तीचा महामार्ग खुला व्हावा यासाठी स्वतःच्या अंगावर दगड गोटे खात या मुक्ती महामार्गामधील असंख्य अडथळे तिने पुढाकार घेऊन दूर केले. अनेकांची घरे सुशिक्षित व्हावी म्हणून वेळ पडली तेव्हा सासरच्या घराचा त्याग सुद्धा केला. दोन शिक्षणसंस्थांच्या आधाराने १८ शाळांची निर्मिती सुद्धा केली. आज त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा होत असताना या सगळ्याची आठवण येणे साहजिकच. पण महिला शिक्षणासोबतच त्यांनी अनेक सामाजिक, साहित्यिक आघाड्यावर लढे उभारले किंबहुना त्यांचा आरंभ केला. या सगळ्यावर प्रकाश टाकणे हे सुद्धा आज गरजेचे वाटते.
आज पंजाब हरियाना मधून संसदेमध्ये पारित झालेल्या तीन विधेयाकांविरोधात शेतकरी आंदोलनाचे सूर उमटत असताना, आंदोलकांचे पुस्तक वाचणे, गाणी म्हणणे हे सगळ पाहिलं कि आजही त्यांच्या
“ब्रम्ह असे शेती | अन्नधान्य देती | अन्नास म्हणती परब्रम्ह |
जे करिती शेती | विद्या संपादिती | तया ज्ञानवंती | सुखी करी |”
या ओळींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शेती आणि शेतकऱ्यांनी आता ज्ञानार्जनाच्या आधुनिक वाटा तपासल्या पाहिजे हा त्यांचा आग्रह कवितेला आधुनिक रूप देताना दिसतो हे ध्यानात घेण्यासारखे आहे. आपल्या पूर्ण हयातीत काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर या कविता संग्रह लिहिलेले आपल्याला दिसून येतात. ज्या काळामध्ये स्त्रीला ज्ञानार्जनाची संधी नव्हती त्या काळामध्ये कवितेच्या नव्या छटा त्यांनी समोर आणल्या.
आजही पुढारलेल्या गावांमध्ये महिला अस्मिता भवन उभे असलेले दिसतात. जिथे विविध बचत गटाच्या महिला एकत्र येताना दिसतात. महिला सेवा मंडळाच्या माध्यमातून त्या काळात सर्व जाती धर्माच्या महिलांना एकत्र येण्यासाठी राखीव जागा मिळाली पाहिजे या मागणीमध्ये अस्मिता भवन उभे राहण्याची बीजे आपल्याला दिसून येतात. आज कित्येक वर्तमानपत्राचे रकाने अर्भक सापडले, बेवारस मुल सापडले अश्या रकान्यांनी भरलेली आम्हाला दिसून येतात. मुल दत्तक घेण्यासाठी आजही समाज धास्तावत नाही. विधवा, परितक्त्या महिलांनी गर्भपात न करता त्याचं बाळंतपण करावं. मुलाचा सांभाळ आम्ही करू म्हणत बालहत्या प्रतिबंधक गृह स्वतःच्या घरात चालू करणे हे आजच्याही काळाच्या कित्येक वर्ष पुढचं पाऊल आहे नक्की. आणि त्याच बालहत्या प्रतिबंधक गृहामधील एक मुल स्वतः दत्तक घेणे हे आणखी एक क्रांतिकारक पाऊल म्हणून ध्यानात घ्यावे लागेल. सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठावरून बाल जठार प्रथेचा विरोध, विधवा पुनर्विवाहाचे समर्थन, केशवपन, सती जाणे या सर्व प्रथांना विरोध सक्षमरित्या केलेला दिसून येतो.
सन १८७५ ते १८७७ च्या काळामध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये अन्नछत्र चालवत असताना पोटासाठी शरीरविक्री करणाऱ्या महिलांचा स्वीकार करणे, त्यांना मान मिळावा यासाठी झटणे. प्लेगच्या साथीमध्ये स्वतः पुढाकार घेत रुग्णांची सेवा करणे आणि सेवा करत असतानाच स्वतः त्याची शिकार होऊन त्यातच त्यांचा अंत होणे हे एखाद्या कार्याच्या समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून समोर येताना दिसते.
आज त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्याचे कारण हेच कि, आज त्यांना महिला शिक्षणाच्या चौकटीत अडकवण्याचा डाव आम्हाला ओळखता यायला हवा. व्यवस्थेविरोधात बंड करत हक्कांसाठी आवाज उठवणे आज आम्हाला शिकावे लागेल. सरस्वती विरुद्ध सावित्री किंवा पुराणातली सावित्री विरुद्ध ज्योतिबाची सावित्री अश्या तुलनात्मक अडगळीत अडकण्यापेक्षा तळागाळामध्ये त्यांचे काम त्याचे विचार रुजवणे. त्यासाठी कृती कार्यक्रम आखणे इत्यादी कामे होणे आज गरजेचे वाटते. ख्रिश्चन मिशनऱ्या, अध्यात्मिक बैठका, धार्मिक शिक्षण, सामाजिक रूढी परंपरा, सामाजिक दबाव अश्या एक न अनेक वादळामध्ये आपल्या कार्याची ज्योत त्यांनी तेवत ठेवली. आता तीच ज्योत तशीच तेवत ठेवण्याची जवाबदारी आपलिये. आपल्या आईचा हा वारसा आपण नक्कीच जपू शकतो, पुढे नेऊ शकतो.
- अझहर नदाफ