राजकीय क्षेत्रात बारामतीच्या नावाची सतत चर्चा होत असते. पण बारामतीतील दहावीत शिकणाऱ्या मुलाने आपल्या तालुक्याचं नाव देशभरात केलं आहे.
बारामती मधील दहावीत शिकणाऱ्या अथर्व घुले या विद्यार्थ्याची यंग सायंटिस्ट म्हणून निवड करण्यात आली आहे.
अथर्व घुले हा विद्यार्थी बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या आर. एन. अग्रवाल टेक्निकल विद्यालयात दहावीचं शिक्षण घेत आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट इंडिया, ए. पी. जे. अब्दुल कलाम कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया आणि रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडियाच्या वतीने अथर्व घुलेला इंडिया इंटरनॅशनल साराभाई स्टुडन्ट सायंटिस्ट अवॉर्ड 2020 ने सन्मानित करण्यात आलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून देशभरातील विविध भागातील पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत झूम मिटींग आणि वेबिनारच्या माध्यमातून संपर्कात होते.
या 5000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 63 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अभिमानाची बाब म्हणजे अंतिम पुरस्कार सोहळ्यासाठी 13 व्या क्रमांकावर अथर्व घुलेची यंग सायंटिस्ट म्हणून निवड करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात मागे नाहीत, त्यांना संधी मिळाली तर ते देखील आपले कौशल्य दाखवू शकतात, हेच अथर्व घुलेने दाखवून दिलं आहे.