दिल्ली | केवळ 20 महिन्याची मुलगी धनिष्ठाने अवयव दान करत पाच रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. धनिष्ठाने दोन्ही किडनी, दोन्ही डोळे तसेच हृदय दान करून गंभीर अवस्थेत असलेल्या पाच रुग्णांचे प्राण वाचवले. इतक्या कमी वयात अवयव दान केल्याने धनिष्ठा देशातील सर्वात तरुण अवयव दान करणारी ठरली आहे.
आठ जानेवारीला बाल्कनीत खेळत असताना धनिष्ठा बाल्कनीतून खाली पडली. धनिष्ठाचे आई वडील आशिष कुमार आणि बबिता यांनी तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये भरती केलं. पण डॉक्टर धनिष्ठाचा जीव वाचू शकले नाही. 11 जानेवारीला तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. धनिष्ठाच्या आई-वडिलांवर आभाळ कोसळलं होतं.
आशिष कुमार एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा अनेक रुग्णांना अवयवांच्या कमतरतेमुळे जीव गमवावा लागत होता. डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणाले की अवयवदान करणाऱ्यांची कमतरता आहे. तेव्हाच धनिष्ठाचे अवयव दान करण्याचा निर्णय आम्ही घेतला.” धनिष्ठाचे हृदय इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील नवजात बालकामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. तर किडनी आणि डोळ्यांचा भाग इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आला.
धनिष्ठाचे वडील म्हणतात धनिष्ठाचे अवयव दान करण्याच्या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला नाही. पण अभिमान नक्कीच आहे आहे. आमच्या मुलीमुळे इतरांचा जीव वाचला याचा अभिमान आम्हाला कायम असणार आहे. त्यामुळे जेव्हा आमच्या मुलीची आठवण होईल तेव्हा दुःखाची जागा अभिमानाच्या भावनेने घेतले जाईल एवढं नक्की.