मागच्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपने नव्या आणलेल्या शर्तींची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याच्या काही चांगल्या, वाईट बाजू उलगडून सांगितल्या जात आहेत, मात्र आता यावर केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
याबाबत व्हॉट्सॲपचे सीईओ यांना केंद्राने एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये व्हॉट्सॲपवर असलेल्या लोकांची माहिती अशा प्रकारे विकली जाणं ही चिंताजनक बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, “तसंच व्हॉट्सॲपवर प्रत्येक प्रकारचे लोक आहेत, त्यांची माहिती, गोपनीयता याबाबत दुसऱ्या कंपनीला माहिती देताना पुनर्विचार करावा. यामध्ये एकांगी करण्यात आलेले बदल हे गंभीर आणि चिंताजनक आहेत आणि हे बदल स्वीकारले जाणार नाहीत.” असं देखील यामध्ये म्हटलं गेलं आहे.
काय होती पॉलिसी?
व्हॉट्सॲपने याबाबत मोबाईल वापरकर्त्यांना “तुम्हाला जर यापुढे व्हॉट्सॲप वापरायचं असेल तर नवीन अटी आणि नियम स्वीकारणं बंधनकारक असेल आणि ते नसेल तर तुम्हाला ८ फेब्रुवारी पासून व्हॉट्सॲप वापरता येणार नाही.” अशा दोनच सूचना दिल्या होत्या. यामध्ये गोपनीयतेबाबत आणि माहिती शेअर करण्याबाबत स्पष्ट उल्लेख केला होता.
यामुळे धोका काय?
या गोष्टीमुळे आपण ज्या ज्या लोकांशी, संस्थेशी जोडले गेलो आहे, त्यांच्याबरोबर झालेल्या संवाद आणि महत्वाची माहिती ही अगदीच सहजपणे उघड केली जाऊ शकते. यामुळे गोपनीयतेचा प्रश्न उभा राहतो.