राज्याच्या राजकारणात टांगणीला लागलेल्या मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार होती. मात्र न्यायालयाने आजच्या सुनावणीला स्थगिती देत सरळ ५ फेब्रुवारी ही सुनावणीची तारीख दिली आहे.
मराठा आरक्षणा संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सध्या राज्यातील मराठा आरक्षणावर तापलेले राजकारण आणि ठाकरे सरकार यांच्यासाठी मराठा आरक्षणावरील सुनावणी हि अतिशय महत्त्वाची ठरली आहे.
दरम्यान, या अगोदरच्या सुनावणीवेळी न्यायालयाने २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला दिला होता. मात्र, २० जानेवारीला हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आले होते. मात्र सर्व पक्षकारांच्या विनंतीनंतर आज न्यायालयानं सुनावणीला स्थगिती दिल्याने या प्रकरणावर ५ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे.