पुणे | २०२० या वर्षात बरेच फिल्म फेस्टिवल रद्द करण्यात आले, तर काही पुढे ढकलण्यात आले. काही दिवसांपूर्वी गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलचा (iffi) श्री गणेशा नुकताच पार पडला. काल पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलचे सर्वेसर्वा डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत घेत, फिल्म फेस्टिवल ४ मार्च ते ११ मार्च यादरम्यान घेतला जाईल अशी अधिकृत घोषणा यावेळी त्यांनी केली.
दरवर्षी जानेवारी महिन्यात पिफ पार पडतो; परंतु गोव्यात (iffi) जानेवारीमध्ये होत असून, पिफने आपली तारीख दोन महिने विलंबाने म्हणजेच मार्च महिन्यात घेणार असल्याचे निश्चित केले आहे. “राज्यसरकारने २०२० या वर्षात बजेटमध्ये पिफसाठी चार कोटींची मंजुरी दिली होती, यंदाच्या वर्षात फेस्टिवल फक्त अडीच कोटी रुपये राज्यसरकारकडून घेणार आहे. दरवर्षी फेस्टिवलसाठी चार कोटी दिले जातात. परंतु सध्या स्थिती मात्र तशी नाही”. असं पटेल यावेळी म्हणाले.
यंदाचा फिल्म फेस्टिवल दोन पद्धतीने संपन्न होणार आहे. एक म्हणजे ऑफलाईन तर दुसरी ऑनलाईन. यावर्षी तब्बल ९३ देशांमधून १,६११ फिल्म्सला पिफमध्ये प्रवेश मिळाला आहे. पिफ मुंबई आणि नागपूर मध्ये दरवर्षी घेण्यात येतो. यावर्षी यामध्ये लातूरचाही समावेश करण्यात आला आहे.