ऐकावे ते नवल अशी एक घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील हा प्रकार जरा भन्नाटच आहे. गेले 15 वर्ष झाली एक कावळा एका घरी दररोज येतो. दाराची कडी वाजवतो व घरात प्रवेश करतो. मंडनगड तालुक्यातील तुळशी गावातील हा प्रकार आहे. येथे कावळा रोज एका घरी येतो. काशिनाथ चिखलकर असे त्यांचे नाव असून, त्यांनी एका कावळ्याला आपल्या भावविश्वात सामावून घेतले आहे.
आपण एखाद्या पाळीव प्राण्याला जसा लळा लावतो तसाच लळा त्यांनी या पक्षाला लावला आहे. यामुळेच गेले 15 वर्ष तो कावळा रोज त्यांच्या घरी येतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतो. चिखलकर यांनी दिलेले फरसान, चपाती, डाळ-भात खातो-पितो. एवढेच नव्हे तर ते कामाला जाताना त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडायला सुद्धा येतो. हा कावळा रोज सकाळी पाणी सुटायच्या वेळेत येतो व चिखलकर पाणी भरेपर्यंत समोरच्या झाडावर बसून राहतो. त्यांनी बोलवताच तो लगेच येऊन त्यांच्या खांद्यावर बसतो.
दरम्यान, चिखलकर कामानिमित्त मुंबईला गेले होते तेव्हा त्याने येणे बंद केले होते मात्र ते लॉकडाऊन मध्ये परत आले तेव्हा पासून तो कावळा परत येऊ लागला.