आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्ताने विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका खास व्हिडिओमधून बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे व विचारांचे कौतुक त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मात्र या व्हिडिओ सोबत फडणवीसांनी “आम्ही कुठेही असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं,’ असे म्हणत शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे : चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!#BalasahebThackeray
#बाळासाहेबठाकरे pic.twitter.com/TPVfnA6sKn— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
‘अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मनं छोटी-छोटी होतात. ते आपल्यापलीकडं पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होतं. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती,’ असे आपल्या या व्हिडिओ मध्ये फडणवीसांनी म्हणले आहे.
तसेच “जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशासाठी? पैशाचे लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नयेत. तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. तुमच्याकडं आदरानं लोक पाहताहेत तो आदर तसाच ठेवा…’ असे बाळासाहेबांच्या भाषणातील अनेक निवडक व सूचक वाक्य त्यांनी शेअर केली आहेत.
दरम्यान चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक असे म्हणत फडणवीस यांनी बाळासाहेबांचे वर्णन केलं आहे. त्यांच्या काही भाषणांसह स्वत:च्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत.