मुंबई | सध्या मराठी सिनेमांची ओटीटी मंच्यावरील रेलचेल म्हणावी तितकी नाही. अनेक मराठी सिनेमे चित्रपटगृहे बंद असल्याने, प्रदर्शना अभावी रखडले आहेत. अशातच आता भोंगा (अजान) हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट येत्या २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र सिनेमाचे प्रदर्शन चित्रपटगृहात होणार की, ओटीटीवर हे मात्र समजू शकलेलं नाही.
या सिनेमामधून ध्वनी प्रदूषणावर भाष्य करणारा विषय दाखविण्यात आला आहे. हलाल आणि धग या सिनेमांचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे. तर अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतच सिनेमाच्या टीमकडून रिव्हील करण्यात आलं. या पोस्टरमुळे सिनेरसिकांच्या मनात सिनेमविषयीची एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सिनेमातून आपल्या आजूबाजूला असणारे कर्कश स्वरूपाचे आवाज, याचा लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती यांना होणारा त्रास, त्यांच्या एकूणच आरोग्यावर होणारा परिणाम अशा विषयाला नेहमीच समाज्याकडून बगल दिली जाते. यावर कायमस्वरूपी तोडगा मात्र निघत नाही. या विषयावर आधारित सिनेमाची कथा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी एका वेगळ्या पद्धतीने भोंगा (अजान) सिनेमामधून मांडली आहे.
सिनेमाच्या पोस्टारवरून सिनेरसिकांच्या मनात या सिनेमाविषयीची उत्सुकता शिगेला लागली आहे.