मुंबई | राज्यपरिवहन महामंडळाची म्हणजेच एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे थकलेलं वेतन देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 112 कोटीचा निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहे.
त्यानुसार हा निधी वितरित करण्यात आला असून, यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. कोरोना संकटकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्वांच्या पाठीशी महाविकासआघाडी सरकार ठामपणे उभे आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाले पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे असेही ते यावेळी म्हणाले. कोरोना संकटकाळात टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाल्याने, एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
प्रवासीसंख्या कमी झाली. त्यामुळे परिवहन महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची कमतरता निर्माण झाली.
या कठीण परिस्थितीचा विचार करता, परिवहन मंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 112 कोटींचा निधी देऊन तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.