बारामती: विदेशी दारूच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक बारामती-पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार या ठिकाणी पलटी झाला. ही घटना (शुक्रवारी ता.28) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी ट्रक चालक आणि क्लीनरला वाचवण्याच सोडून, ट्रकच्या मागील बाजूस असणाऱ्या विदेशी दारूच्या बाटल्या लंपास केल्या.
ट्रकच्या मागच्या बाजूस असणाऱ्या ताडपत्रीला सत्तूराने पाडून, विदेशी दारूच्या बाटल्या अक्षरशहा पोत्यात, पिशव्यात भरून नागरिकांनी लंपास केल्या. एकप्रकारे बाटल्यांची लूटच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी केल्याची घटना या ठिकाणी घडली. विशेष म्हणजे, यामध्ये लहान मुलांसोबत पुरुष आणि महिलांचा देखील समावेश होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ताज्या बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
बारामती-पाटस महामार्गावर दारूचा ट्रक पलटी, नागरीकांनी बाटल्या केल्या लंपास, पहा व्हिडीओ..#Baramati #Patas pic.twitter.com/fnZyHjIocS
— TheBhongaa.com (@Bhongaa_) October 30, 2021
पिंपळी (बारामती) येथील कंपनीचा हा ट्रक असून, विदेशी दारू घेऊन जळगावला निघाला होता. परंतु या ठिकाणी अपघाताची दुर्दैवी घटना घडली. ट्रक चालवत असताना अचानक ट्रक चालकाच्या डोळ्यावर झापड आली. यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रक या ठिकाणी असणाऱ्या पवार ढाब्याजवळ पलटी झाला. याची माहिती आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे नागरिकांनी अक्षरशः या बाटल्या पोत्यात, पिशवीत भरून पळून नेल्या.
बारामती ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल होताच लोकांनी या ठिकाणाहून पळ काढला. ट्रकमध्ये सुमारे 65 लाख रुपयांचे 950 बॉक्स भरलेले होते, अशी माहिती चालक नीलेश गोसावी आणि क्लीनर अंकुश बेंद्रे (राहणार बारामती) यांनी दिली. दोघांनी बाटल्या पळूवू नका असं आवाहन करुन सुध्दा स्थानिकांनी आम्हालाच मारहाण करून ट्रकमधील दारूच्या बाटल्या पळून नेल्या अशी माहिती दिली आहे