सध्या बिग बॉस ही टीव्ही मालिका चांगलीच गाजत आहे. बिग बॉसच्या हिंदी मालिकेचा मुख्य म्हणून अभिनेता सलमान खान गेल्या १० ते १२ वर्षांपासून काम पाहतो आहे. मराठीतही मागील तीन वर्षांपासून ही मालिका सुरु झाली आहे.
मालिकेचे सुत्रसंचलन अभिनेते महेश मांजरेकर हे करतात. त्यावेळेसच्या बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये १७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. १०० दिवसांसाठी ही मालिका सुरु होती. यात प्रसिद्ध मराठी अभिनेते, अभिनेत्रींनी भाग घेतला होता.
बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन हा मराठमोळ्या विशाल निकमने आपल्या नावावर केला आहे. विशालला महाराष्ट्रातील मराठी लोकांनी भरभरून प्रेम दिले. विशालला बक्षीस म्हणून २० लाख रुपये आणि बिग बॉस मराठी सिझन तीनची ट्रॉफी भेट म्हणून देण्यात आली आहे.
खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा, नेहमी योग्य गोष्टीला साथ देणे, खरेपणा यामुळे तो बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये चांगलाच गाजत होता.
सध्या त्याने बिग बॉस मराठी सिझन तीनची ट्रॉफि आपल्या नावावर केल्याने सोशल मीडियामध्ये त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विशालचा अभिनयाचा प्रवास मात्र वाटतो तितका सोपा नाही.विशाल हा मूळचा सांगलीकर असून त्याला लहानपणापासूनच अभिनय करण्याची आवड होती.
वडील शेतकरी असूनही विशालने कधी लाज बाळगली नाही आणि आपली मेहनत कायमचं सुरु ठेवली.
मास्टर इन फिजिक्सची पदवी आणि सोबतीला अभिनयाचे धडे घेत असताना त्याने स्वप्नांचा पाठलाग करत मुंबई गाठली.
सुरुवातीला त्याने मुंबईमधील जिमांमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणूनही बऱ्याच दिवस काम केले. त्यानंतर त्याने मराठी चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय साकारला. अभिनयासोबतच डान्स, मार्शल आर्ट्स आणि तलवार बाजीचंही विशालने प्रशिक्षण घेतलं आहे.
विशालच्या जिद्दीची ही कहाणी तमाम तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे