जानेवारी महिन्यातील सर्वात प्रथम येणार सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत या दिवशी लोक एकमेकांना तिळगूळ देऊन वर्षभर गोड बोलण्यास सांगत असतात. तीळ आणि गूळ यापासून तिळगुळ बनवले जातात आणि ते सर्वांना देऊन ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे म्हणले जाते.
या मकर संक्रातीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिळगुळाची अपेक्षा न करता काम केलं तर लोक तुम्हाला गोड बोलतील अशा शब्दात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
मकर संक्रातीवेळी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “कामे न करताही बोलणारे लोक आहेत. मात्र, आमचा कारभार उघड असतो. आम्ही काही लपवत नाही. महापालिका नेमकी काय आहे? कसं काम करते? हे समोर आले पाहिजे. शेवटी आपलं काम बोलतं असतं. शंका घेणारे अनेकजण आहेत. मात्र, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही.” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि भाजपलाही सुनावले आहे.
शुक्रवारी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी कामासाठी तिळगुळाची अपेक्षा न करता काम केलं तर लोक तुमच्याशी गोड बोलतील, असा गोड सल्ला देऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.
दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येणाऱ्या काळात मुंबईतील रहाणीमान उत्तम असेल असा विश्वास वर्तविला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असल्याचे सांगितले आहे.