पुणे: राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक जास्त होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लागू करून शाळा, महाविद्यालये आणि पर्यटन स्थळांवर बंदी आणली होती.
मात्र, आता रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात निसर्गरम्य अशी पर्यटने स्थळे आहेत.
पावसाळ्यात गड, किल्ल्यांसह या पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत असतात. मात्र, कोरोनाच्या धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटनस्थळावर बंदी घातली होती.
मात्र, मागील काही दिवसांचा आढावा घेऊन रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे प्रशासनाने पर्यटनस्थळे खुले केली आहेत. तसेच, प्रशासनाने कलम १४४ रद्द केला आहे.
पर्यटनस्थळालगतच्या सर्व हॉटेल चालकांना आणि दुकानदारांना मास्कचा वापर आणि कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.