आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे म्हटले जाते. ज्या व्यक्तीचे शरीर निरोगी आणि सुदृढ असते त्याला आयुष्यात काहीही करण्याची ऊर्जा आणि क्षमता असते. त्याचवेळी वयानुसार शरीरात पोषक तत्वांची कमतरता होणे ही गोष्ट सामान्य असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करणे आजिबात योग्य नाही.
शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि ‘व्हिटॅमिन बी’च्या कमतरतेमुळे हिमोग्लोबीन लेवल कमी होते. हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. मात्र, यासाठी औषधांची गरज नसून चांगल्या आहाराने रक्ताची वाढ होऊन हिमोग्लोबीन वाढू शकते.
रक्तातील हिमोग्लोबीनचं प्रमाण योग्य प्रमाणात असण्यासाठी लोहाची गरज असते. आहारात आपण योग्य फळांचा आणि भाज्यांचा समावेश केल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवू शकतो.
आवळा – आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण झपाट्याने वाढते.
काळे मनुके – रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता मनुके भरुन काढण्यास मदत करतात. लोहयुक्त काळे मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.
गूळ – गुळात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. लोह वाढण्यासाठी गूळ शेंगदाणे हे एकत्र खाणे फायदेशीर असते.
पालक – पालक हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. आयर्न व्यतिरिक्त पालकमध्ये ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात.
हा आहार टाळा – लोह आणि कॅल्शियम असा एकत्रित आहार घेऊ नये. तसेच, चहा, कॉफी, सोडा, वाईन, बीयर इत्यादी गोष्टी टाळाव्यात.