सातारा (Satara) जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ (Shirval) गावातील क्रांतीसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालय येथे 10 मार्चला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास चार पोलिस वस्तीगृहात (Police Beaten Students in shivral) शिरून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.
मध्य रात्री पोलिस वस्तीगृह आल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरू केला. पोलिस आलेले बघून मुलांनी आणखी गोंधळ केला आणि त्यामुळे पोलिसांनी तेथे लाठीचार्ज केल्याचे समजते. त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
रात्रीच्या वेळी कोणतीही समज न देता आम्हाला पोलिसांनी मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी तीन पोलिस कर्मचारी आणि एक होमगार्ड यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांच्या सर्व टिमने महाविद्यालयाला भेट दिली.
महाविद्यालय प्रशासन,वसतीगृह प्रमुख आदींना कोणतीही पूर्व कल्पना न देता पोलिसांनी सुरक्षा रक्षकासह विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाची झळ राज्यातील शिरवळ, मुंबई, नागपूर, परभणी, उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांना बसली. महाविद्यालये सर्व विद्यार्थ्यांकडून बंद ठेवण्यात आली.