सर्व सामान्या कुटुंबातील मुलगी, त्यातच घरची परिस्थिती हलाखीची. कोणताही क्लास न लावता स्वतःच्या हिमतीवर अभ्यास सुरू केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कोल्हापुरातील बापट कॅम्प येथे राहून केली, आणि पीएसआय पदाच्या परीक्षेत यश मिळवलं.
ही यशोगाथा आहे, कोल्हापूर येथील एका तरुणीची! धनश्री तोरस्कर असं या तरुणीचं नाव.
धनश्रीने प्रचंड मेहनत करुन पीएसआय पदाला गवसणी घातली आणि पोलीस वर्दीत कोल्हापूर येथे घरी परतली. तेव्हा तिचे स्वागत कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी जल्लोषात केले. परीक्षेत तिने स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आणि तिच्या दिवंगत आईचं स्वप्न साकार केलं. तसेच ग्रामस्थांनी धनश्रीच्या जिद्द आणि मेहनतीला सलाम ठोकला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2017 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी धनश्री तोरस्कर पात्र ठरली. धनश्री ही कोल्हापुरातील रग्बीची पहिलीच राष्ट्रीय खेळाडू आहे.
धनश्री तोरस्कर स्पर्धा परीक्षेच्या तयारी बद्दल बोलताना सांगतात की, “मी शिक्षण शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर इंग्रजी या विषयातून कमला कॉलेजमधून पदवी घेतली. त्यांनंतर एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं क्लासेस लावता येणार नव्हते. त्यामुळे दिवसरात्र अभ्यास केला.”
“अभ्यासाच्या काळात सण आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं टाळलं. धनश्री सांगते या यशात तिची दिवंगत आई मनीषा तोरस्कर, वडील विठ्ठल तोरस्कर, भाऊ राहुल तोरस्कर, बहिण पूनम मोहिते तसेच मामा संजय घाटगे यांचे मोलाचं सहकार्य लाभलं आणि ग्रामस्थांनी त्या काळात मदत केली, त्यामुळेच यश मिळवता आले.”