गेल्या काही दिवसांपासून देशातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढत्या तापमानाला लोक चांगलेच हैराण झाले आहेत. मुख्य म्हणजे, या वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. ओडिशा सरकारने राज्यांतील शाळांची वेळ ६ ते ९ अशी केली आहे.
उन्हाचा पारा चढण्याच्या आत सरकारने शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना देखील या वाढत्या तापमानाचा त्रास नको यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.
मात्र शास्त्रज्ञ आरके जेनामानी दिलेल्या माहितीनुसार, फक्त काही भागातच उष्णतेची लाट येऊ शकते असे सांगितले आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारपर्यंत राजस्थानमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचे परिणाम दिसून येत होते. परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडल्यानंतर तापमान नियंत्रणात आले आहे.
दरम्यान येत्या काही दिवसांत वायव्य भारतातील भागांमध्ये कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ, गडगडाटी वादळ निर्माण होणार असल्याची माहिती खात्याने दिली आहे.